संस्कृतभारती नागपूर महानगराच्या संस्कारसुधा बालकेंद्राचा उद्घाटन समारंभ संपन्न
संस्कृतभारती नागपूर महानगराच्या वतीने २९ आॕगस्ट २०२१ या दिवशी संस्कारसुधा बालसंस्कार केंद्राचा उद्घाटन समारंभ आभासी माध्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर यांनी कार्यक्रमात उपस्थित सर्व बालगोपालांना कथा माध्यमातून मार्गदर्शन करीत प्रेरित केले. प्रमुख वक्त्या मा.ऋचा हळदे (सहसचिव भारतीय शिक्षण मंडळ) यांनी बालकेन्द्रातील बालकांना आत्मनिर्भरतेचा संदेश देताना भारतीय संस्कृतीचे मूल्यांचे जतन करावयाचे असेल तर निसर्गावरती मातृवत प्रेम करायला शिकले पाहिजे हा संदेश दिला. बीजरुपात असलेल्या या विद्यार्थ्यांचे संस्कृत शिकत असताना कल्पवृक्षात रुपांतर व्हावे ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. मा. श्रीश देवपुजारी (अखिलभारतीय महामंत्री संस्कृतभारती) विशेषत्वाने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती वंदनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर महानगरमंत्री डॉ. संभाजी पाटील यांनी केले. अतिथी परिचय व गीतगायन अनघा कुंटे यांनी केले. उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी आभासी माध्यमातून नोंदणी केली आहे. नवी संकल्पना नवे विचार नवा ध्यास हे नागपूर संस्कृतभारतीचे वैशिष्ट्य असल्यामुळे या बालकेन्द्राचे नियोजन करतांना बालकेंद्राच्या संयोजिका सौ. रेखा गोथे व संपूर्ण चमूने या केन्द्रातील ५०० विद्यार्थ्यांना २० गणांमध्ये विभाजित करून २० स्वयंसेवी शिक्षकांची नियुक्ती केली. हा साप्ताहिक उपक्रम वर्षभर सुरू राहणार अशी घोषणा केली. यामध्ये संस्कृत संभाषण संस्कृत प्रार्थना स्तोत्रे क्रीडा कथा इत्यादींचे अध्यापन होणार आहे. कार्यक्रमात रेखा गोथे यांनी विद्यार्थ्यांना संस्कृतचा एक आदर्शपाठ देखील शिकविला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कु. तृप्ती काशीकर या बालिकेने संस्कृत मध्ये केले. हर्षिता व अन्य सहभागी यांनी संस्कृत लघुनाटिका सादर केली. कार्यक्रमातील या बालकांच्या सादरीकरणाचे नियोजन करण्याचे कार्य चन्द्रमोहन गोयल यांनी केले. या कार्यक्रमातील सर्व आयोजक मार्गदर्शकांचे आभार केतकी डांगे यांनी मानले..
- Post By : Vidarbha
- |
- 07-09-2021
- |




